पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग आठ पदरी एलिव्हेडेट कॉरिडॉर

 0
पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  आठ पदरी एलिव्हेडेट कॉरिडॉर

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मेट्रोमार्गानंतर दुसरा मार्ग करण्यात येत आहे.त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून,तो लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला जाईल. नवीन मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून, रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा यामार्गे तो चाकणपर्यंत असणार आहे. या नव्या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा ७५ टक्के भाग मेट्रोशी कनेक्ट होईल,असा दावा अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे.

 पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराकडे नवीन मेट्रो मार्ग निर्माण करण्याबाबत शासनाची उदासीनता दिसून येत आहे.तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याचे विविध संघटना आणि संस्थांकडून सात्याने मागणी केली जात आहे.मात्र,त्याबाबत केंद्र,राज्य शासन तसेच,महापालिका प्रशासन गंभीर नसल्याने अनेक घटनांवरून समोर आले आहे.

नागरिकांचा रेटा लक्षात घेऊन महापालिकेने निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआरचा आराखडा तयार करण्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (महामेट्रो) सांगितले आहे. त्यानुसार, महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाद्वारे शहराच्या दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोने जोडला जाणार आहे. या संपूर्ण मार्गामुळे तसेच, निगडी ते दापोडी मार्गामुळे पिंपरी-चिंचवडचा ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाईल,असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

महामेट्रोकडून आराखडा येत्या ४ ते ५ महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे.त्या डीपीआरला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन तो मंजुरीसाठी राज्य व नंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

* नाशिक फाटा ते चाकणच्या जुना डीपीआर बदल -

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनेवरून नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा महामेट्रोने दोन वेळा डीपीआर तयार केला.पहिल्यांदा निओ मेट्रोचा आराखडा तयार केला होता.त्यानंतर सुधारणा करून मेट्रोचा आराखडा तयार केला.आता पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तयार करणार आहे. तो आठ पदरी ‘एलिव्हेडेट कॉरिडॉर’ असणार आहे. तो मार्ग नाशिक फाटा येथून सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा पुन्हा बदलला जाणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून मेट्रोचा नव्याने सुधारित डीपीआर तयार करण्यात येणार आहे.

* असा असेल नवीन मार्ग -

निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्टेशन, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे. या मार्गाचे अंदाजे ३५ ते ४० किलोमीटर अंतर आहे.

०००००