जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक ७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता
सह्याद्री डिजिटल | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम येत्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, मतदानाची संभाव्य तारीख ७ फेब्रुवारी २०२६ अशी असू शकते. सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुरळा सुरू असल्याने, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेचा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थापन, मतमोजणी प्रक्रिया, तसेच निवडणुकीदरम्यान उद्भवू शकणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकांनंतर तातडीने जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य आहे का, यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमुळे अनेक अधिकारी व कर्मचारी त्याच प्रक्रियेत गुंतलेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उभे करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.याच कारणामुळे निवडणूक कार्यक्रमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे मर्यादित मुदतवाढ मागण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणूक कार्यक्रम जानेवारीअखेर जाहीर केल्याचे न्यायालयाला कळवून, प्रत्यक्ष मतदानासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ देण्याची विनंती केली जाऊ शकते.
राजकीय पक्षांकडूनही प्रचारासाठी अपुरा कालावधी मिळत असल्याने निवडणूक प्रक्रियेचा कालावधी वाढवण्याची अनौपचारिक मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाची बैठक झाल्यानंतर या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.