दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त भाजप चाकण मंडल/राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहरकडून पत्रकारांचा सन्मान
सह्याद्री डिजिटल | मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाजप चाकण मंडल आणि राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहर यांच्याकडून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील घडामोडी निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास उपसरपंच कालिदास वाडेकर, भाजप चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर,राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहर अध्यक्ष राम गोरे,अनिल देशमुख,मोबिन काझी,डॉ.विजय खरमाटे,अजय जगनाडे,संदेश जाधव,प्रीतम शिंदे,गौतम ओव्हळ,अर्जुन बोराडे,धीरज वाळुंज, पंढरीनाथ सुतार,किशोर भुजबळ,अरुण जोरी, संदेश जाधव,दत्ता परदेशी,गणपती गौडा पाटील, योगेश देशमुख,नसीम पठाण,आशिष शेवकरी मंगेश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी चाकण शहर व परिसरातील चंद्रकांत मांडेकर,संजय बोथरा,कल्पेश भोई,अविनाश राळे,हनुमंत देवकर या पत्रकारांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
भाजप मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, “मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणाऱ्या जांभेकरांनी समाजप्रबोधनाचा जो विचार दिला,तो आजही पत्रकारांसाठी मार्गदर्शक आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राम गोरे यांनीही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत, “सत्य, वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारितेमुळेच समाज जागरूक राहतो. प्रशासन व लोकप्रतिनिधींना जबाबदार ठेवण्याचे काम पत्रकार करतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान होणे आवश्यक आहे,”असे मत व्यक्त केले.
माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांनीही या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानत समाजहितासाठी प्रामाणिक पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला.