राजकीय विशेष | खेड बाजार समितीचे सभापतीपद ठरतेय का राजकीय ग्रहण? प्रतिष्ठेची खुर्ची की राजकीय अस्त
खेड (पुणे) - राज्यात तीनशेहून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असून प्रत्येक बाजार समितीची स्वतःची वेगळी ओळख आहे. काही समित्या आर्थिक उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही शेतीमालाच्या आवकेसाठी राज्यभर चर्चेत असतात.मात्र,पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही तिच्या आर्थिक सुबत्तेपेक्षा एका वेगळ्याच राजकीय इतिहासामुळे कायम चर्चेचा विषय ठरत आली आहे.
१९५० च्या दशकात स्थापन झालेल्या या बाजार समितीने खेड तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे नेतृत्व पाहिले आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, आतापर्यंत तब्बल ३० जणांनी या समितीचे सभापतीपद भूषवले आहे. काहींना दोन ते तीन वेळा या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या पदासोबत एक अजब राजकीय योगायोग किंवा ‘शाप’ जोडला गेल्याची चर्चा तालुक्यात वारंवार रंगताना दिसते.
सभापतीपद मिळाले अन् राजकीय कारकीर्द थांबली? -
खेड बाजार समितीच्या राजकीय इतिहासाकडे पाहिल्यास एक वेगळेच वास्तव समोर येते. बाजार समितीचे सभापतीपद भूषवून त्यानंतर पदाचा राजीनामा दिलेल्या अनेक नेत्यांची पुढील राजकीय कारकीर्द अचानक मंदावली किंवा त्यांना मुख्य राजकीय प्रवाहातून बाहेर पडावे लागल्याचे चित्र दिसून आले आहे.अनेक नेत्यांनी सभापतीपदानंतर मोठ्या राजकीय संधींची अपेक्षा ठेवली होती. मात्र, पुढील निवडणुकांमध्ये अपयश, संघटनांमधील दुय्यम भूमिका किंवा राजकीय विजनवास अशा परिस्थितींना अनेकांना सामोरे जावे लागल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
स्व.नारायणराव पवार ठरले एकमेव मोठे अपवाद -
या संपूर्ण इतिहासात दिवंगत माजी आमदार नारायणराव पवार हे एकमेव मोठे अपवाद मानले जातात. त्यांनी १९७६ ते १९७९, १९८२ ते १९८३ आणि १९९१ ते १९९७ अशा तीन वेगवेगळ्या कालखंडात बाजार समितीचे सभापतीपद यशस्वीपणे सांभाळले.महत्त्वाचे म्हणजे, या पदानंतर त्यांनी खेड तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत दमदार प्रतिनिधित्व करत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले होते. त्यामुळे बाजार समितीच्या सभापतीपदावरून पुढे मोठ्या राजकारणात झेप घेणारे ते एकमेव प्रभावी नेतृत्व ठरल्याची चर्चा आजही तालुक्यात होते.
“मोठी स्वप्ने असतील तर सभापतीपद टाळा” -
खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात आणि जुन्या जाणकार नेत्यांमध्ये याबाबत एक अलिखित समज आजही प्रचलित असल्याचे बोलले जाते. भविष्यात आमदारकी, खासदारकी किंवा मोठ्या राजकीय पदांची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या नेत्यांनी बाजार समितीच्या सभापतीपदापासून दूर राहणेच योग्य, असा सल्ला अनेक वरिष्ठ नेते खासगीत देताना दिसतात.कारण,आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे हे पद पुढील राजकीय कारकिर्दीसाठी अडथळा ठरते की काय,अशी भीती अनेकांच्या मनात असल्याचे दिसून येते.
प्रतिष्ठेचे पद की राजकीय धोक्याची घंटा? -
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या समितीचे सभापतीपद मिळवणे हे कोणत्याही नेत्यासाठी प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र, इतिहासातील अनेक उदाहरणे पाहता हेच पद पुढे संबंधित नेत्यांच्या राजकीय अस्ताचे कारण ठरते की काय, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.हा केवळ योगायोग आहे की खरोखरच ‘राजकीय शाप’, हा प्रश्न मात्र आजही खेड तालुक्याच्या राजकारणात अनुत्तरितच आहे.