चाकण नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तासंघर्षाला सुरुवात; उपनगराध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग
सह्याद्री DIGITAL NEWS | बहुचर्चित चाकण नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आता सत्तास्थापन आणि महत्त्वाच्या पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांकडून उपनगराध्यक्ष पद तसेच विविध अंतर्गत समित्यांच्या अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, ही पदे वाटप करताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत.शिंदेसेनेचे १३ नगरसेवक विजयी झाल्याने नगरपरिषदेत त्या गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. निवडून आलेल्या एकमेव अपक्ष उमेदवाराने सुद्धा शिंदेसेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे उपनगराध्यक्षपदी शिंदे गटाच्याच नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता अधिक आहे.तरी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातून निवडून आलेल्या आपल्या भावाला उपनगराधक्ष पदी बसवण्यासाठी त्या नेत्याने वरिष्ठ पातळीवर जोरदार फोल्डिंग लावली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.जातीय समीकरणे आणि राजकीय बेरजेचा विचार करता बहुजन समाजातील एखाद्या नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद मिळू शकते,असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. स्पष्ट बहुमतामुळे घोडेबाजारावर मर्यादा येतील,असेही मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुसऱ्या पक्षातील एका नगरसेवकाने “सहा नगरसेवक सोबत घेऊन येतो, उपनगराध्यक्ष पद द्या” असा प्रस्ताव शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याचबरोबर स्वीकृत सदस्यपदासाठीही काही कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून या जागेचा ‘शब्द’ देण्यात आला असल्याचा दावा काही इच्छुकांकडून केला जात असून, त्यामुळे आपणास संधी मिळणार असल्याचा प्रचारही शहरात सुरू आहे.
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे १०० कोटी रुपयांची झालेली आर्थिक उलाढाल झाली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. निवडणूक काळात एका मतासाठी दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम देऊन मते विकत घेण्यात आल्याच्या चर्चा आपसात होत आहेत. विशेष म्हणजे एका उमेदवाराला अवघ्या २० मतांनी पराभव स्वीकारावा लागला असून, याच उमेदवाराला मागील पंचवार्षिक निवडणुकीतही असाच अनुभव आल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
मतमोजणीदरम्यान माध्यम प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रार होती. त्यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २०२५ मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकाला २०१५ सालचा शिक्का असलेले विजय प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर चुकीमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर टीका होत आहे.
या निवडणुकीत उद्धवसेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने काही दिवसांपूर्वी ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून ओळख असलेल्या चाकण शहरात उद्धवसेनेची पिछेहाट झाली असल्याची दिसून आले.तर शिंदेसेनेचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून आले.राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली उद्धवसेना आणि शिंदेसेनेची युती यावेळी चाकण नगरपरिषद निवडणुकीत झाली असली,तरी या युतीचा फायदा प्रामुख्याने शिंदे गटालाच झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
राज्यात सर्वत्र आघाडीवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मात्र या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, हे विशेष मानले जात आहे.मात्र मतांची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले.निवडणुकीदरम्यान एबी फॉर्म देताना प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना अनेक इच्छुक उमेदवारांची समज काढावी लागली. या धांदलीत अखेर केवळ एकच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने त्याचाही विशेष उल्लेख केला जात आहे.
एकूणच चाकण नगरपरिषद निवडणूक संपल्यानंतरही सत्तास्थापन, पदवाटप आणि राजकीय समीकरणांमुळे शहरातील राजकारण तापलेलेच असून, पुढील काही दिवसांत कोणाला कोणते पद मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.