कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात विनया मुंगसे यांचा गावभेट दौरा; माघी गणेश जयंतीनिमित्त गणरायाचे दर्शन
ZP ELECTION | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार विनया सुधीर मुंगसे तसेच आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणाचे उमेदवार थोरवे काळूराम ज्ञानोबा यांच्या प्रचारार्थ धानोरे, चऱ्होली खुर्द आणि सोळू या गावांमध्ये गावभेट दौरा पार पडला.
या दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत नागरिकांचे आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावभेटीत उमेदवार विनयाताई मुंगसे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. या सर्व प्रश्नांचे निराकरण करून स्थानिक विकासाला गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान,माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त विनयाताई मुंगसे यांनी कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील चऱ्होली खुर्द (पगडे वस्ती), क्लाऊड ११ सोसायटी, चऱ्होली तसेच सोळू येथील गणेश मंदिरात उपस्थित राहून गणरायाची मन:पूर्वक आरती व दर्शन घेतले.
गणरायाकडे प्रार्थना करताना त्यांनी कुरुळी - आळंदी ग्रामीण गटाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प यशस्वी होवो,तसेच सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य,सुख,शांती व समाधान लाभो,अशी सदिच्छा व्यक्त केली.दर्शनानंतर मंदिर परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.