महाळुंगे - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात राजकीय उलथापालथ;निष्ठावंत शिवसैनिक गणेश नाणेकर शिंदे गटाकडून रिंगणात

 0
महाळुंगे - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात राजकीय उलथापालथ;निष्ठावंत शिवसैनिक गणेश नाणेकर शिंदे गटाकडून रिंगणात

ZP Election / महाळुंगे - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील निष्ठावंत शिवसैनिक गणेश विठ्ठल नाणेकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने गटातील राजकारण चांगलेच तापले आहे.गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून तळागाळात काम करणाऱ्या नाणेकर यांना डावलल्याचे नाराजी त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्रपणे व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद गटातील ग्रामविकास,पाणी,रस्ते, वीज,आरोग्य तसेच सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत गणेश नाणेकर यांनी जनतेत आपली ठाम ओळख निर्माण केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले असून अखेर त्यांनी वेगळा राजकीय निर्णय घेतला आहे.शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला असून, उद्या ते अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महाळुंगे - नाणेकरवाडी गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जीवन खराबी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गणेश बोत्रे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या गटात आता शिवसेना (उद्धव गट), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट तिरंगी लढत होणार आहे.

निष्ठावंत शिवसैनिकाला डावलल्याने निर्माण झालेली नाराजी, शिंदे गटाकडून झालेली उमेदवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्षम उमेदवार यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाळुंगे - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, येथील निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.