सामाजिक | आंबेठाण येथे रस्ता दुरुस्तीसाठी दोन दिवस वाहतूक बंद;पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
चाकण - वासुली फाटा - बिरदवाडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आहे.या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी दि. २८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते दि. २९ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून, हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी याबाबतची तात्पुरती अधिसूचना जारी केली आहे.
आंबेठाणमधील सा.क्र. ४/४७० ते ४/५७० दरम्यानचा १०० मीटरचा रस्त्याचा भाग बांधकाम कालावधीत ‘डिस्कोप’ करण्यात आला होता. मात्र, सद्यस्थितीत या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांसह ट्रॅफिक मुक्त कृती समितीने या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा केला होता.याची दखल घेत वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्यातील कलम ११५, ११६ आणि ११७ अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करत या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.
महाळुंगे-चाकण वाहतूक विभागांतर्गत आंबेठाण हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवाडी फाटा दरम्यान दोन दिवस सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल. वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
असे असतील पर्यायी मार्ग -
तळेगाव बाजूकडून येणारी वाहने: ही वाहने वासुली फाटा – एचपी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच भारत पेट्रोल पंपाशेजारील चौक – महाळुंगे गाव वाय पॉईंट मार्गाचाही वापर करता येईल.
आंबेगावमार्गे येणारी वाहने: या वाहनांसाठी महाळुंगे गाव वाय पॉईंट मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
चाकण व खेड बाजूकडून येणारी वाहने: ही वाहने बिरदवडी चौक – महाळुंगे गाव वाय पॉईंट तसेच बिरदवडी चौक – वाघजाई चौक मार्गे वळविण्यात येणार आहेत.
जड व अवजड वाहनांना 'नो एंट्री' -
पुणे-नाशिक महामार्गावरील भाम फाटा व आंबेठाण चौक येथून बिरदवडी फाट्याकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना या कालावधीत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या सर्व अवजड वाहनांना चाकण-तळेगाव चौक मार्गाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.