राजकीय व्यक्तींच्या ओळखीचा कथित वापर; बदल्यांचे आमिष, अधिकाऱ्यांवर दबाव अन् संगमनेरमधील झटापटीची चर्चा
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) : शासकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि ठेकेदारांशी संबंधित कथित ब्लॅकमेलिंग, बदल्यांचे आमिष आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील प्रभात चौधरी हे महाशय चर्चेत आले आहेत. विविध कामे करून देण्याचे आश्वासन देत आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप त्याच्यावर होत असताना आता त्याने थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांचा स्वीय सहाय्यक (पीए) होण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अकोले तालुक्यातील काही राजकीय नेते, महसूल विभाग, पाटबंधारे विभागातील अधिकारी तसेच ग्रामसेवकांवर दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.चौधरी यांनी स्वतःच्या कळस बुद्रुक गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडेही विविध कामांची मागणी करत दबाव निर्माण केल्याची चर्चा गावात सुरू आहे. या वादातून संगमनेर शहरात झटापटी झाल्याचीही चर्चा असून, या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
मंत्रालयातील ओळखीचा वापर करून शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे आरोप या महाशयावर झाले आहेत. राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्यांच्या विभागाच्या नावाचाही या प्रकरणातील कथित चर्चेत उल्लेख होत आहे. मात्र, संबंधित विभागाचा किंवा मंत्र्यांचा या व्यवहाराशी संबंध असल्याचा कोणताही निष्कर्ष उपलब्ध माहितीवरून काढता येत नाही.
अकोले तालुक्यातील काही छोट्या ठेकेदारांची मंत्रालयातून थकीत बिले मंजूर करून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून सुमारे लाखो रुपये घेतल्याची चर्चा आहे. संबंधित ठेकेदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे का? पैसे कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या माध्यमातून देण्यात आले? याची चौकशी झाल्यास या कथित व्यवहारांमागील सत्य समोर येऊ शकते.
इतक्या गंभीर आरोपांची चर्चा सुरू असतानाच या महाशयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील काही आमदारांकडे स्वीय सहाय्यक पदासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. मात्र, संबंधित आमदारांनी त्याची पार्श्वभूमी तपासल्यानंतर त्याला पद देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित होत आहे.
लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिक, अधिकारी किंवा ठेकेदारांची फसवणूक होत असेल, तर अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्यास त्याचा फटका संबंधित लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेलाही बसू शकतो. त्यामुळे अशा नियुक्त्यांपूर्वी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.