प्रेम संबंधातील वादातून तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
चाकण जवळील मेदनकरवाडी येथील घटना
चाकण (पुणे) | प्रेमसंबंधातील टोकाच्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची विचित्र घटना चाकण नजीक असलेल्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथे घडली. या प्रकरणातील आरोपी आसाम राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच चाकण दक्षिण पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अवघ्या आठ तासांत जेरबंद केले.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी (दि.१६) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी येथील एका पत्र्याच्या खोलीमध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे जखमी तरुणाचे नाव अमिनुल इस्लाम असल्याचे समोर आले. तसेच त्याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव शाहिदुल इस्लाम शेख असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेच्या तपासादरम्यान इमामुल हक अब्दुल बारक (वय २३, मूळ रा.आसाम) याच्याकडूनही महत्त्वाची माहिती मिळाली. घटनेनंतर आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी मोबाइल बंद करून पुणे शहराच्या दिशेने प्रवास करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच तो परराज्यात म्हणजेच आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पुणे रेल्वे स्थानकावर सापळा रचला. अखेर आरोपी आसामला रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेपासून अवघ्या आठ तासांच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, आरोपीकडे केलेल्या चौकशीत जखमी अमिनुल इस्लाम याच्याशी त्याचे प्रेमसंबंधांवरून वाद असल्याचे समोर आले. याच वादातून त्याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती तपासात पुढे आली.पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस करत आहेत.
चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, सहपोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त योगेश रांगणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या ही कारवाई केली.