चाकणमध्ये शिवनेरी एसटी बस अडवून चालकाला मारहाण

चाकण दक्षिण पोलिसांकडून दोन जणांना अटक

 0
चाकणमध्ये शिवनेरी एसटी बस अडवून चालकाला मारहाण

चाकण(पुणे) | स्वारगेटहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसला रस्त्यात अडवून चालकाला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना चाकण येथील मुटकेवाडी सिग्नल चौकात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त होत असतानाच चाकण दक्षिण पोलिसांनी तत्परतेने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ही घटना (दि.१० नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.प्रज्ञानंद पांडुरंग गवई (वय ४३, रा. नाशिक) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते शिवनेरी बस क्रमांक MH 06 ES 1364 घेऊन स्वारगेट येथून नाशिककडे जात असताना मुटकेवाडी सिग्नल चौकात दोन तरुणांनी त्यांच्या मोटारसायकलने बसचा मार्ग अडवला.त्यानंतर संबंधित तरुणांनी बसच्या दरवाजातून आत प्रवेश करून चालकाला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, १२६(२), १२१(१), २२१ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी करण मारुती गायकवाड (वय २३) आणि कार्तिक मारुती गायकवाड (वय २०, दोघेही रा. गायकवाड वस्ती, कुरुळी,ता.खेड,जि.पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सहायक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते,अंमलदार राहुल मिसाळ, ख्वाजा शेख, विशाल बंड व प्रियंका गिरी यांनी पार पाडली.