क्राईम | चाकणला २३ किलो गांजासह तिघांना अटक;१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाची चाकण परिसरात कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) चाकण परिसरात गुरुवारी एक मोठी कारवाई केली आहे. अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पथकाने रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा, ३ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहर आणि परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शहरात विशेष पेट्रोलिंगसाठी वेगवेघळी पथके तैनात केली होती.
अशी झाली कारवाई -
(दिनांक २७ मे रोजी) दुपारी ३.२५ वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दौंडकर हे चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, शिक्रापूर-चाकण हायवेरोडवर मोहितेवाडी (शेलपिंपळगाव, ता. खेड) येथील 'हॉटेल वैष्णवी' समोर सार्वजनिक ठिकाणी तीन इसम संशयास्पदरीत्या थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने तात्काळ सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे -
१) संदिप भगवान हांडे (वय २८, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. पिपरखेड, जि. छत्रपती संभाजीनगर)
२) गणेश सुरेश तारु (वय ३०, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. घोडगाव, ता. आंबेगाव)
३) रिहान वसिम शेख (वय १९, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे)
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल -
याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरजिल्हा अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुकाळे करत आहेत.
या पथकाने बजावली कामगिरी -
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रदिप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि विक्रम गायकवाड, निखिल शेटे, विजय दौंडकर, सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, निखिल वर्षे, संतोष सपकाळ आणि चंद्रकांत जाधव यांच्या विशेष पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.