चाकण एमआयडीसीत तब्बल १५ कोटी ४० लाखांच्या अॅल्युमिनियम मटेरियलचा अपहार

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

 0
चाकण एमआयडीसीत तब्बल १५ कोटी ४० लाखांच्या अॅल्युमिनियम मटेरियलचा अपहार

चाकण (पुणे) | चाकण औद्योगिक क्षेत्रातील वासुली येथील अॅडव्हिक ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन कंपन्यांमधील तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम मटेरियलचा संगनमताने अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी नितीन आनंदा सावंत (वय ३९, रा. शिरोली, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश मकवाना, लहाणु पुणेकर, दीपक कोळेकर, प्रमोद होले, दीपेश तिवारी, अजय पाटोळे, विठ्ठल साळुंखे, जलालुद्दीन मोहम्मद, प्रदीप पटवा आणि वसीम शेख अशा स्टोअर अधिकारी, कंत्राटी कामगार, कंपनीच्या व्हेंडरचा प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट चालक आणि भंगार व्यावसायिकांचा या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.३ डिसेंबर २०१८ ते २० ऑगस्ट २०२६) या कालावधीत वासुली येथील अॅडव्हिक हाय-टेक प्रा. लि. कंपनीचे प्लांट पी-१५०० व पी-३४०० तसेच अॅडव्हिक अॅटो कॉम्प प्रा. लि. कंपनीचे प्लांट पी-३६०० व पी-३९०० येथील स्टोअरमधील मटेरियलचा अपहार करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने उत्पादनासाठी आवश्यक असलेले चांगले अॅल्युमिनियम मटेरियल, स्क्रॅप मटेरियल तसेच पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात येणारे मटेरियल परस्पर वळविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्टोअरमधील मटेरियलची वाहतूक करण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर हे मटेरियल भंगार व्यावसायिकांना विक्री करून आर्थिक लाभ मिळविल्याचा आरोप आहे.

या कथित प्रकारामुळे कंपनीचे तब्बल १५ कोटी ४० लाख ९२ हजार ८७६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अपहार केलेले असल्याची माहिती असूनही काही भंगार व्यावसायिकांनी हे मटेरियल वारंवार खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपनीत कोट्यवधी रुपयांच्या मटेरियलचा कथित अपहार उघड झाल्याने औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.