क्राईम | कौटुंबिक वादातून तिघांना बेदम मारहाण; डोक्यात कुकर मारून एकाला केले गंभीर जखमी
चाकण औद्योगिक वसाहतीच्या वासुली (ता.खेड) येथे कौटुंबिक वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून एकाच कुटुंबातील तिघांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या वादात एका आरोपीने घरातील स्टीलचा कुकर थेट फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तात्याराव बाबाराव तायडे (वय ४८ वर्षे, रा. वासोली फाटा, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. वाघळूद, जि. वाशिम) यांनी याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रवि धर्माजी सावळे (वय ३८) आणि अतुल धर्माजी सावळे (वय ३०, दोघेही रा. वासोली, टेट्रा कंपनीजवळ, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय घडली? -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्याराव तायडे यांची मुलगी प्रिती हिचा विवाह आरोपी रवि सावळे याच्याशी झाला आहे. २५ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रिती सावळे आणि तिची लहान बहीण चैत्राली तायडे या दोघी काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि आधार कार्ड आणण्यासाठी वासोली येथील रवि सावळे याच्या घरी गेल्या होत्या.त्यावेळी आरोपी रवि सावळे याने, "तू येथून कुठेही जायचे नाही आणि काहीही न्यायचे नाही," असे म्हणत प्रितीला अडवून धरले व वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रितीने तातडीने फोन करून आपले वडील तात्याराव तायडे यांना तेथे बोलावून घेतले.
विनंती करूनही कुकरचा प्रहार -
फिर्यादी तात्याराव हे मुलीला सोडवण्यासाठी जांभळे यांच्या रूमवर पोहोचले असता, दुसरा आरोपी अतुल सावळे याने, "तुम्ही माझी वहिनी प्रिती हिला येथून कशी नेता तेच मी पाहतो," अशी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी भावांनी मिळून फिर्यादी तात्याराव, प्रिती आणि चैत्राली यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादी तात्याराव यांनी, "आम्हाला जाऊ द्या, मारहाण करू नका," अशी गयावया करत विनंती केली. मात्र, संतापलेल्या रवि सावळे याने घरात असलेला स्वयंपाकाचा कुकर हातात घेतला आणि थेट तात्याराव यांच्या डोक्यात मारला. या जीवघेण्या हल्ल्यात तात्याराव यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली.यानंतरही दुसरा आरोपी अतुल याने फिर्यादी व त्यांच्या लहान मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरूच ठेवले.
पोलीसांकडून गुन्हा दाखल -
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तात्याराव तायडे यांच्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गंभीर दुखापत करणे, घरात घुसून मारहाण करणे व धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.