दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बालचिमुकल्यांनी साकारला शिवकालीन इतिहास

 0
दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड(पुणे) | दिवाळी सणाचे औचित्य साधून श्री. विकासदादा ठाकूर मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी बु. (ता. खेड, जि. पुणे) येथे भव्य ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला गावातील बालचिमुकल्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि महाराष्ट्राचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. मेहनत, कलात्मकता आणि ऐतिहासिक जाणिवेचा सुंदर संगम त्यांच्या किल्ल्यांमधून पाहायला मिळाला. प्रत्येक किल्ल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट किल्ल्यांची निवड करण्यासाठी विशेष निवड समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने परीक्षण करून प्रथम पाच क्रमांकांच्या विजेत्यांची निवड केली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून अनोख्या पद्धतीने पार पडला. आयोजक, प्रायोजक आणि निवड समितीच्या सदस्यांनी विजेत्यांच्या घरी जाऊन त्यांनी साकारलेल्या किल्ल्यांसमोरच बक्षीस वितरण केले. या उपक्रमामुळे विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला.

* स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक : कु. अथर्व सचिन हुंडारे व आदित्य गणेश हुंडारे – राजगड किल्ला. (बक्षीस – स्पोर्ट्स सायकल)

द्वितीय क्रमांक : कु. तनिषा विकास वाळुंज व तेजस विकास वाळुंज – पन्हाळा किल्ला. (बक्षीस – वॉटर प्युरिफायर)

तृतीय क्रमांक : कु. शुभम काळूराम गोऱ्हे – विजयदुर्ग किल्ला. (बक्षीस – टेबल फॅन)

चतुर्थ क्रमांक : कु. समीक्षा सचिन वाळुंज व साईशा नितीन वाळुंज – प्रतापगड किल्ला. (बक्षीस – स्मार्ट वॉच)

पाचवा क्रमांक (विभागून) : १. कु. यश काळूराम वाळुंज – विजयदुर्ग किल्ला. २. कु. सोहम गणेश राऊत – रायगड किल्ला.

पाचव्या क्रमांकाच्या दोन्ही विजेत्यांसह सर्व विजेत्यांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत हॉटेल न्यू महादेव, संतोषनगर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अतुलभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून दिवाळीच्या आनंदासोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. मोबाईल आणि डिजिटल युगात बालकांना शिवकालीन इतिहास, गड-किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख करून देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. श्री. विकासदादा ठाकूर मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.