सत्तेपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा

गोरगरीबांची सेवा हाच आप्पांचा खरा वारसा – प्रिया पवार

 0
सत्तेपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा

खेड (पुणे) | सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजसेवेला आणि माणुसकीला अधिक महत्त्व देत आयुष्यभर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले खेड तालुक्याचे लाडके लोकनेते स्व. आमदार नारायणराव (आप्पा) पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपणारा उपक्रम राबविण्यात आला. आप्पांच्या जिव्हाळ्याच्या कातकरी आणि ठाकर समाजातील बांधवांना 'आनंदाचा शिधा' वाटप करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

स्व. नारायणराव (आप्पा) पवार यांचे खेड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी आणि ठाकर वस्त्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. कोणताही राजकीय बडेजाव न करता त्यांनी कायम या समाजातील बांधवांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, आपल्या मुलाचे वाढदिवसही ते ठाकर वस्त्यांवर जाऊन तेथील गोरगरीब बांधवांच्या सहवासात साधेपणाने साजरे करीत असत. केवळ राजकीय आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी जपणाऱ्या आप्पांच्या आठवणींना या उपक्रमातून उजाळा मिळाला. यावेळी जुन्या आठवणी सांगताना अनेक ज्येष्ठ बांधव भावूक झाले.

याप्रसंगी आप्पांच्या कन्या प्रिया पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "आज या आपल्या माणसांमध्ये वावरताना प्रत्येकाच्या चेहऱ्यात आणि डोळ्यांत मला आप्पांचेच प्रतिबिंब दिसत होते. ही भावना मनाला स्पर्शून गेली. गोरगरीब जनतेवर आप्पांचे असलेले निःस्वार्थ प्रेम आणि आपुलकी शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली. त्यांचे विचार, संस्कार आणि जनसेवेचा वारसा अखंडपणे पुढे नेणे, हाच माझा ठाम निर्धार आहे."

या उपक्रमामुळे कातकरी आणि ठाकर समाजातील अनेक गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचला. आप्पा आज आपल्यात नसले तरी त्यांनी जपलेली माणुसकी, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभाव आजही त्यांच्या कार्यातून जिवंत असल्याची भावना उपस्थित बांधवांनी व्यक्त केली.

सत्तेपेक्षा माणुसकी मोठी आणि पदापेक्षा समाजसेवा श्रेष्ठ, हा विचार आपल्या कृतीतून जपणाऱ्या माजी आमदार स्व. नारायणराव आप्पा पवार यांना या उपक्रमातून खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली.