जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
चिखलीत चौघांचा पाठलाग करीत जीवे मारण्याचा प्रयत्न
चिखली(पुणे) | जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी संगनमत करून एका २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरात घडली. आरोपीने शर्टाच्या आत लपवून आणलेल्या लोखंडी कोयत्याने तरुणाच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत तरुणाने वार चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतरही आरोपींनी शिवीगाळ करीत तरुणाचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रघुनाथ सातपुते (वय २६, रा. मोरेवस्ती, चिखली) हे दूध डेअरीचा व्यवसाय करतात. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास ऐश्वर्यम कोर्ट यार्ड इमारतीसमोरील शिवशक्ती किराणा दुकानाजवळ ही घटना घडली.
जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी क्रमांक एक ते चार यांनी आपापसांत संगनमत केले. यावेळी मुख्य आरोपीने शर्टाच्या आतून लोखंडी कोयता काढून विजय सातपुते यांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. मात्र, सातपुते यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविला आणि मोटारसायकलवरून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या अन्य आरोपींनीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. 'आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा जीव घ्यायचा आहे,' असे म्हणत चौघांनी शिवीगाळ करीत सातपुते यांचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३(५), आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती असून चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.