पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी अंत; चाकण येथील घटना

चाकण ( पुणे ) : पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.३१) मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.चाकणजवळील कडाचीवाडी (ता.खेड ) गावच्या हद्दीतील पाझर तलावात हा प्रकार घडला.स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने चाकण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओमकार बाबासाहेब हंगे (वय.१३ वर्ष,सध्या रा. मार्तंडनगर,मेदनकरवाडी,मूळ रा. हंगेवाडी,ता.केज,जि.बीड),श्लोक जगदीश मानकर (वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा.धनवडी,ता.वरुड,जि.अमरावती),प्रसाद शंकर देशमुख( वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा.अंबुलगा,ता.मुखेड,जि.नांदेड),नैतिक गोपाल मोरे ( वय.१३ वर्षे,सध्या रा.मेदनकरवाडी,मूळ रा. बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट,जि.अकोला ) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की,वरील चोघे जण शनिवारी राहत्या घरातून सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते.चाकणजवळील कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले होते.पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आल्या.स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.