चाकणच्या आंबेठाण चौकात दुचाकीस्वाराच्या पायावरून गेले कंटेनरचे चाक
चाकण ( पुणे ) : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा धक्का लागून दुचाकीस्वार गाडीखाली आल्याने त्याच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक चाकण सोमवारी (दि.२५) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली.
प्रसाद संजय जोंधळे (वय.३२ वर्षे,रा.आंबेठाण चौक, दावड मळा,चाकण, ता.खेड,जि.पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद जोंधळे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच १७ बीटी १९५८) भोसरीकडे कामावर जात होते.ते आंबेठाण चौकात आले असता,त्यांच्या दुचाकीला कंटेनरच्या पाठीमागील बाजूच्या चाकाचा धक्का लागल्याने हा अपघात झाला.प्रसाद जोंधळे यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले.कंटेनरच्या चाकाखाली त्यांचा डावा पाय आल्याने गुडघा, कंबर व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.