विधानसभेत तळेगाव - चाकण रस्त्याची नुसतीच चर्चा;तरी नागरिकांच्या आशा पल्लवीत

 0
विधानसभेत तळेगाव - चाकण रस्त्याची नुसतीच चर्चा;तरी नागरिकांच्या आशा पल्लवीत

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत प्रस्तावित चार पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख आजच्या ( दि.१० ) विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी उल्लेख केल्याने वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे सदर रस्त्यांचे काम लवकरच सुरु होणार असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाच्या निविदा आणि भूसंपादन प्रक्रियेला अजून किती दिवस लागणार असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

  तळेगाव - चाकण - शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर मागील सात वर्षांपासून केंद्र सरकारच्या कोटींच्या निधीच्या घोषणांच्या पावसात सुकाळात हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी याचे काम गेली कित्येक वर्षे प्रलंबितच राहिले.गतवर्षी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आला.नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम आता होणार आहे. सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी,कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे व मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कॅबिनेट मंजुरी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन देऊन कॅबिनेट मंजुरीसाठी साकडे घातले. त्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तळेगाव-चाकण रस्त्याच्या कामाचा अर्थसंकल्पात समावेश झाल्याने पाठपुराव्याला न्याय मिळाल्याची भावना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

०००००