खेड तालुक्यातील जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण; सकाळी दहा वाजता एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात
सह्याद्री LIVE | खेड तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून,सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. खेड तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण यांची मतमोजणी एकाच वेळेस होणार असून, प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक त्या सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मतमोजणीसाठी EVM मशीनद्वारे मतमोजणीसाठी १६ टेबल तसेच टपाली मतमोजणीसाठी २ टेबल अशी एकूण १८ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ८ गट व १६ गणांची मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार असल्याने निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सर्व उमेदवार तसेच त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांनी सकाळी ठीक ९ वाजता खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल, राजगुरुनगर येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उपस्थित राहताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहीचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मतमोजणी प्रतिनिधींबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद उमेदवारांना त्यांच्या गटासाठी EVM मतमोजणीसाठी २ व टपाली मतमोजणीसाठी १ असे एकूण ३ प्रतिनिधी नेमता येतील.
पंचायत समिती उमेदवारांना त्यांच्या गणासाठी EVM मतमोजणीसाठी १ व टपाली मतमोजणीसाठी १ असे २ प्रतिनिधी नेमता येतील.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निकालाकडे लक्ष लागलेल्या उमेदवारांसह समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता असून, उद्याचा दिवस खेड तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.