चाकण नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; माघारीनंतर चित्र स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने

 0
चाकण नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; माघारीनंतर चित्र स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने

चाकण नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झाली आहे. उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतरच्या काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अर्ज माघारीनंतर ( दि.२१ )अखेर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.एकूण बारा प्रभागातून ७१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.तर नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहे.

* चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 

मागील दोन दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडी प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना (शिंदे गट ) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांची बिनविरोध निवड होत शिंदेसेनेंचे पुणे जिल्ह्यातील पहिले नगरसेवक होण्याचा मान पटकवला.तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने प्रभाग क्रमांक १० मधून प्रकाश भुजबळ आणि ७ मधील महिला उमेदवार वर्षा शेवकरी यांची बिनविरोध निवड होत शिंदेसेनेंवर सरशी केली.

* महायुतीतच राजकीय घमासान -

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अप)आणि शिवसेना (शिंदे गट ) महायुतीतील दोन्ही पक्ष चाकण नगरपरिषदेत थेट आमनेसामने उभे ठाकले असून एकूण बारा प्रभागांत चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

* नगराध्यक्षपदाची लढत चौरंगी -

चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद जनतेतून असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाकडून भाग्यश्री विवेक वाडेकर,शिवसेना ( शिंदे गट ) मनिषा सुरेशभाऊ गोरे,काँग्रेस पक्षाच्या संगीता बाळासाहेब गायकवाड तर भाजपच्या हर्षला घनश्याम चौधरी यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

* माघारीच्या अखेरच्या दोन दिवसांत अनेक अनपेक्षित हालचाली घडल्या.काही प्रभावी इच्छुकांनी प्रभागातून अचानक माघार घेतल्याने दोन्ही प्रमुख पक्षांचे गणित पूर्णपणे बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक असंतोष,विकासाचा ठप्प वेग आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या या मुद्द्यांवर भिस्त ठेवत उमेदवारी अंतिम केली. तर शिंदेंसेनेने ‘विकासाचे राजकारण’ या घोषणेसह मजबूत संघटनशक्ती, तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सत्तेचा पाठिंबा यांचा आधार घेत मोर्चेबांधणी केली आहे.

* काही प्रभागांत बंडखोर उमेदवारांच्या उपस्थितीमुळे तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली असून, प्रचाराची रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.शहरातील वाहतूक कोंडी,पाणी पुरवठा समस्या,औद्योगिक क्षेत्राचा वाढता ताण, ड्रेनेजची दुरवस्था आणि रस्त्यांची बिकट अवस्था हे मुद्दे मतदारांच्या चर्चेत ठळकपणे पुढे येत आहेत.

* चाकणची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात असल्याने दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काही दिवसांत प्रचाराचा तापमान आणखी वाढणार असून, चाकणकरांना रंगतदार हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार, हे निश्चित.