आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश; पुल दुरुस्तीसाठी ३ कोटी साकव बांधणीसाठी १६० लक्ष रुपये
सामाजिक | खेड तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध ५ पुलांच्या दुरुस्ती तसेच दोन साकव बांधकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,खेड यांच्याकडे संबंधित पुलांच्या दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती.त्यानुसार पुढील कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
वांद्रे - आंबोली - पाईट - शिरोली मार्गावरील पापळवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी ४० लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.निघोजे - चिंबळी - आळंदी - धानोरे मार्गावरील निघोजे येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख १३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
धामणे-आसखेड-कुरकुंडी-कोरेगाव-चांदूस-पिंपरी-वाकी-काळूस-भोसे मार्गावरील काळूस गावाजवळील पुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ९९ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. याशिवाय वांद्रे-आंबोली-पाईट-शिरोली मार्गावरील कोये गावाजवळील पुलासाठी २९ लाख ६२ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
चांदूस गावाजवळील लहान पुलाच्या बांधकामासाठी ९१ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३ कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे. या कामांमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुकर होण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर गोसासी येथील समाजमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधण्यासाठी १ कोटी रुपये तसेच वाफगाव येथील माघाडे वस्ती, बौद्धवस्ती आणि नेटकेवस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर साकव उभारण्याच्या कामासाठी ६० लाख रुपये या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी या कामांचा मोठा फायदा होणार आहे.
आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामांना गती मिळत असून, भविष्यातही विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.