माऊलींच्या पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन
रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा आपल्याच मिळावी यासाठी केले होते उपोषण
आळंदी (अर्जुन मेदनकर) : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा आपल्यालाच मिळावी,या मागणीसाठी कमला एकादशीच्या मुहूर्तावर महाद्वार चौकात बैलजोडीसह उपोषणाला बसलेले उमेश रानवडे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. पुढील ४८ तासांत बैठक घेऊन यावर सन्माननीय तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या वर्षी माऊलींच्या पालखी रथाची बैलजोडी सेवा रानवडे कुटुंबाकडे आहे. यासाठी आलेल्या अर्जांमधून बैलजोड निवड समितीने हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या नावांना मंजुरी देत तसे पत्र दिले होते. मात्र, या सेवेची संधी आपल्या कुटुंबाला (उमेश रानवडे) मिळावी, या आग्रही मागणीसाठी उमेश रानवडे यांनी थेट बैलजोडीसह महाद्वार चौकात उपोषण सुरू केले होते.
मान्यवरांच्या मध्यस्थीने सुसंवाद -
उपोषणामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सायंकाळी चारच्या सुमारास प्रमुख आळंदीकर ग्रामस्थ, देवस्थानचे प्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घेतला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत खालील मान्यवर उपस्थित होते:
बबनराव कुऱ्हाडे (अध्यक्ष, बैलजोड निवड समिती व माजी नगराध्यक्ष),नंदकुमार कुऱ्हाडे पाटील (माजी उपनगराध्यक्ष),योगी निरंजन नाथसाहेब (विश्वस्त, देवस्थान),माऊली वीर (व्यवस्थापक, देवस्थान),विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे, ज्ञानोबा वहिले, राहुल चिताळकर पाटील आणि पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे.
४८ तासांची मुदत; पोलीस ठाण्याला पत्र -
"पुढील ४८ तासांच्या आत एक विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत सर्वांना मान्य होईल असा सन्माननीय तोडगा काढला जाईल." — बैलजोड निवड समिती
या आश्वासनानंतर उमेश रानवडे यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपेय प्राशन करून आपले उपोषण शांततेत मागे घेतले. दरम्यान, बैलजोड निवड समितीने देवस्थानकडून मिळालेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने आपले अधिकृत पत्र आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी देवस्थानला सुपूर्द केले आहे. या यशस्वी मध्यस्थीमुळे आळंदीतील तणाव निवळला असून सर्वांचे लक्ष आता आगामी ४८ तासांत होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.