रोहित्र चोरीनंतर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न मार्गी लागणार
तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद स्थायी समितीचा पुढाकार
पुणे : खेड तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीला जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोहित्र चोरीला गेल्यानंतर नवीन रोहित्र मिळण्यासाठी पोलीस तक्रार, शाखा अभियंत्यांचा अहवाल आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या प्रक्रियेमुळे अनेकदा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होत असून शेतीपंपांसह वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढू नये या कारणास्तव पोलीस यंत्रणेकडून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याने रोहित्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आणखी लांबते. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना अनेक दिवस अंधारात राहावे लागते.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्या सुनिता शरद बुट्टे-पाटील यांनी (दि. ८ मे ) २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर (दि.५ जून ) २०२६ रोजीच्या बैठकीत कार्यवृत्त अंतिम करण्यात आले असून या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना अधिकृत पत्र पाठविले आहे.
या निर्णयामुळे रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये तक्रार नोंदणी आणि अहवाल प्रक्रियेतील अडथळे दूर होऊन महावितरणकडून नवीन रोहित्र तातडीने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा जलद गतीने पूर्ववत होऊन शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.