एसटी प्रवासात साडे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

 0
एसटी प्रवासात साडे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम | शिवाजीनगर - नाशिक एसटी बसमधून प्रवास करत असताना एका महिलेच्या बॅगेतील तब्बल ५ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण उत्तर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी संगिता मोहन जाधव (वय ५५,धंदा घरकाम,रा.आगरमाथा, कडुस,ता.खेड,जि. पुणे) या (३० जानेवारी २०२६) रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास पती मोहन उद्धव जाधव,सुन अक्षदा मयूर जाधव व नात अरोही (वय ३ वर्षे) यांच्यासह भोसरी येथून खेडकडे जात होत्या.त्या शिवाजीनगर - नाशिक एसटी बसने प्रवास करत असताना मोशी (ता. हवेली) ते चाकण दरम्यान ही घटना घडली.

बस मोशी येथे थांबल्यानंतर तीन महिला व दोन लहान मुले बसमध्ये चढली.त्यापैकी दोन महिला फिर्यादीजवळ येऊन बसल्या.एका महिलेने जाधव यांच्या मांडीवरील बॅग खाली ठेवण्यास सांगत स्वतःचे लहान मूल त्यांच्या हातात दिले.त्याचवेळी उभी असलेली महिला गप्पा मारत त्यांचे लक्ष वेधून घेत होती.या गोंधळाचा फायदा घेत खाली बसलेल्या दोन महिलांनी बॅगेतील सुमारे ५ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले आहेत.

घटनेनंतर संबंधित महिलांनी बसमधून उतरून पसार झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकरणाची ‘झिरो एफआयआर’ ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून वर्दी अहवाल खेड येथील न्यायालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे करीत असून,पोलिसांकडून परिसरातील कॅमेऱ्यांची तपासणी सुरू असून संशयित महिलांचा शोध घेतला जात आहे.