बलात्कारी आरोपीच्या पुणे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आवळल्या मुसक्या

 0
बलात्कारी आरोपीच्या पुणे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आवळल्या मुसक्या

पुणे : शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. आरोपीला पकडून देण्यात ग्रामस्थांचा मोठा हातभार लागला.आरोपीने घटना घडल्यानंतर तब्बल ४५ तास पोलिसांना चकवा दिला. कधी ऊसाच्या शेतात लपून बसला होता.

युवतीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला.त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.

आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची तब्बल १३ पथके रवाना करण्यात आली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला.गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता आहे.संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबविला. मात्र, गावात ये-जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर २४ तास नाकाबंदी सुरू होती. सुमारे २५० पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे.

रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आला आणि अडकला. आल्यानंतर, मला पश्चाताप होतोय, मला सरेंडर व्हायचं आहे, असे बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले.

* मी चुकीचं कृत्य केलंय, मला पश्चाताप होतोय...

दत्ता गाडे याचे नातेवाईक महेश बहिरण नावाच्या व्यक्तीच्या घरी दत्ता रात्री साडे दहाच्या सुमारास आला. मी चुकीचे कृत्य केलेय, मला पोलिसांच्या स्वाधीन व्हायचंय, अशी कबुली त्याने त्यावेळी दिली. मला आता सहन होत नाही, माझ्याकडून चूक झाली, असे त्याने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो पुन्हा ऊसाच्या शेतात निघून गेला. तिथून तो रात्री पाण्याच्या कॅनालच्या बाजूला झोपलेला आढळून आला.

आरोपी पोलिसांच्या हाताला लागल्यावर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला आणण्यात आले आहे. रात्री त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोपी दत्ताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.