ओळखीच्या व्यक्तिकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला;हल्लेखोर अटकेत;दक्षिण चाकण पोलिसांची कारवाई

 0
ओळखीच्या व्यक्तिकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला;हल्लेखोर अटकेत;दक्षिण चाकण पोलिसांची कारवाई

क्राईम | खेड तालुक्यातील चाकणजवळील नाणेकरवाडी परिसरात बुधवारी (दि. १ एप्रिल २०२६) दुपारी धक्कादायक हल्ल्याची घटना घडली असून, ओळखीच्या व्यक्तीनेच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

* घटना कशी घडली?

फिर्यादी रेवण केरवा कावळे (वय ४५, रा. रामनगर, चिंचवड) हे कामानिमित्त खराबवाडी येथील हायटेक कंपनीत गेले होते.मात्र, कंपनीत वीज नसल्याने काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर त्यांना केळकरनगर, नाणेकरवाडी येथे सोडण्यात आले.दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते आरोग्यम हॉस्पिटल जवळून जात असताना अचानक मागून आलेल्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने जोरदार वार केला.

* ओळखीच्या व्यक्तीकडून हल्ला -

हल्लेखोर जनार्धन तुकाराम पांचाळ (वय ५२) हा फिर्यादीचा ओळखीचा असल्याचे समोर आले आहे. त्याने कोयत्याने वार करत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यावेळी फिर्यादीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावर गंभीर जखम झाली. तसेच बरगडीवरही वार करण्यात आला.

* नागरिकांमध्ये दहशत -

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही धमकावत कोयता उगारून धाव घेतली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भीतीपोटी नागरिकांनी दुकाने बंद करत पळ काढला.

* पोलिसांची कारवाई -

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी जनार्धन पांचाळ याला पोलिसांनी अटक केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.