‘पॉलिश’च्या बहाण्याने सोन्यावर डल्ला!वदिवसाढवळ्या एक लाखांचे दागिने लंपास
भांडी आणि पैजण स्वच्छ करून जिंकला विश्वास; मिनी गंठण व कर्णफूल घेऊन काळ्या पल्सरवरून पोबारा
राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यातील रेटवडी-जरेवाडी येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत तब्बल एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, निता सुनिल पवळे (वय ४७, व्यवसाय – शेती, रा. रेटवडी-जरेवाडी, ता. खेड) या ३ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. त्यांनी तांब्याची भांडी तसेच पायातील चांदीचे पैजण पॉलिश करून स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखविले.
सुरुवातीला त्यांनी तांब्याची भांडी आणि पैजण स्वच्छ करून दिल्याने महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी कानातील कर्णफूल आणि गळ्यातील मिनी गंठण पॉलिश करून देण्याची ऑफर दिली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पवळे यांनी गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण आणि डाव्या कानातील सोन्याचे कर्णफूल त्या दोघांकडे दिले.
मात्र, दागिने हातात मिळताच दोन्ही भामट्यांनी क्षणार्धात ते घेऊन धूम ठोकली. घरासमोर उभी असलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून ते पसार झाले.
फिर्यादीनुसार चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफूल असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.