छऱ्याची बंदूक हातात धरून महामार्गवर दहशत;एकावर गुन्हा दाखल
चाकण ( पुणे ) : छऱ्याची बंदूक खरी आहे,असे भासवून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून व चाकणला महामार्गावरील आंबेठाण चौकात दहशत निर्माण होईल,असे वर्तन केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी बुधवारी (दि.१९) एकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
चाकण पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश नामदेव नाईकरे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चाकण पोलिसांनी रोहन एकनाथ बोऱ्हाडे (वय - २३ वर्षे, रा.कानसे माळवाडी,ता. आंबेगाव) याच्यावर हत्याराबाबत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिसांनी याप्रकरणी बोऱ्हाडे याच्याकडून एक हजार रुपये किमतीची बनावट बंदूक जप्त केली आहे.
दरम्यान रोहन बोऱ्हाडे हा छऱ्याची बंदूक खरी आहे असे भासवून आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना गाडीच्या बाहेर हात काढून छऱ्याची बंदूक दाखवत दहशत निर्माण करत जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वाहतूक विभाग चाकणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड,पोलीस कर्मचारी बाळा जाधव, इंद्रजीत कांबळे आदींनी पुणे नाशिक महामार्ग नाकाबंदी करून फिल्मी स्टाईलने आरोपीस ताब्यात घेतले.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.