चाकणच्या जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी, उद्योजक तुकाराम नारायण मुटके यांचे निधन

 0
चाकणच्या जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी, उद्योजक तुकाराम नारायण मुटके यांचे निधन

चाकण | चाकण नगरीच्या सामाजिक, कृषी आणि उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी, उद्योजक तसेच मुटके कुटुंबाचे मार्गदर्शक तुकाराम नारायण मुटके (वय ९८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मुटके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चाकण परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

स्वर्गीय तुकाराम मुटके यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात शेतीबरोबरच उद्योजकीय क्षेत्रातही योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीत कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबातील पुढील पिढीला शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यामुळे मुटके कुटुंबासाठी ते केवळ कुटुंबप्रमुख नव्हे, तर प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

ते चाकण लायन्स क्लबचे प्रकाश तुकाराम मुटके तसेच खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक आणि चाकण विविध विकास सोसायटीचे संचालक नवनाथ तुकाराम मुटके यांचे वडील होत.

तसेच चाकण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके आणि चाकण कार्यकारी विविध विकास सोसायटीचे चेअरमन अभिषेक नवनाथ मुटके यांचे ते आजोबा होत.

मुटके कुटुंबातील अनेक पिढ्यांना त्यांनी आपल्या अनुभवातून दिशा दिली. त्यांच्या निधनामुळे कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या जाण्याने चाकणच्या जुन्या पिढीतील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.