कंपनीतील ठेक्याच्या कामावरून होतोय वाद;औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी लागली वाढीस

राजगुरुनगर : पुणे, पिंपरी-सिंचवडसह जिल्ह्याच्या विविध भागांत गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा ठेका मिळविण्यावरून धुमश्चक्री उडत आहे.नुकतीच खेड तालुक्याच्या पूर्व भागातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ठेक्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.
मागील काही वर्षात पुण्याचा विस्तार चौफेर झाला.अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या विविध भागांत सुरू झाल्या.या औद्योगिक क्षेत्राबरोबरच गुन्हेगारीही त्याच पटीत वाढली,विशेषतः कंपनीतील ठेका मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये संघर्ष सुरू झाला.
औद्योगिक क्षेत्रातील सर्वच व्यावसायिक या गुन्हेगारीमुळे त्रस्त झाले आहेत.खंडणीसाठी अमक्या दिल्या जात असल्या.तरी गुन्हेगारांच्या भीतीने हे व्यावसायिक पोलिसांकडे तक्रार करायला धजावत नाहीत.गुन्हेगारी वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे.कंपनीला कामगार पुरविणे,सुरक्षारक्षक पुरविणे,कंपनीतील भंगार विकण्यासाठीही ठेकेदारांमध्ये नेहमीच वाद होतात.यातील काही घटना उघडकीस येतात तर बहुतांश घडामोडी ह्या परस्पर मिटवल्या जात आहेत.यामध्ये अनेकदा एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.तालुक्याच्या विविध भागांत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय वाढला,यामधून मुबलक पैसा मिळू लागला,पण त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात जास्त पैसा मिळत असल्यामुळे अनेकांनी तिकडे मोर्चा वळविला.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेश) औद्योगिक क्षेत्रातील हुंडाई कंपनीच्या गेटसमोर ठेकेदारीवरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही घटना उघडकीस आली.या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर काही तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.खेड पोलिसांनी ही माहिती जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना देण्यास टाळाटाळ केली.सेझ भागात पोलीस चौकी उभारली; मात्र पोलीस बळाअभावी ही पोलीस चौकी सध्या बंद अवस्थेत आहे.