कंपनीची दोन कोटी रुपयांची फसवणूक; आरोपीला चोवीस तासात गुजरात मधून अटक

 0
कंपनीची दोन कोटी रुपयांची फसवणूक; आरोपीला चोवीस तासात गुजरात मधून अटक

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसीमधील एका कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून संचालक असल्याचे भासवून क्लायंटला पेमेंट करायचे सांगत एक कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी गुरुवारी (१५ मे) गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी २४ तासांत एका आरोपीला गुजरातमधून अटक केली. तसेच गुन्ह्यातील एक कोटी रक्कम होल्ड करण्यात पोलिसांना यश आले आहे. जेनील वसंतभाई वाघेला (कामरेज सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून मेसेज करणारी व्यक्ती कंपनीची संचालक असल्याचे भासवले. फेक मेसेज द्वारे कंपनीला प्रोजेक्टसाठी क्लायंटला तात्काळ पेमेंट ट्रान्सफर करायचे असल्याचे सांगून एका बँक खात्यावर एक कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. कंपनीच्या खऱ्या संचालकांना पेमेंटचा मेसेज गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अकाउंटंटने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला.

 सायबर पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांची दोन पथके तयार केली. गुन्ह्यात वापरलेले बँक खाते आणि इतर संबंधित माहिती पोलिसांनी काढली. आरोपींनी गुन्ह्यातील काही रक्कम वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही रक्कम सुरत जिल्ह्यातील कामरेज येथून काढली जात असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुजरात येथे जाऊन तात्काळ जेनील वाघेला याला ताब्यात घेतले. त्याने त्याचा साथीदार प्रिन्स विनोदभाई पटेल, नकुल खिमाने यांच्याशी संगनमत करून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे,सहायक आयुक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे, सौरभ घाटे, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री वाखारे, स्मिता पाटील, योती साळे, महेश मोटकर, प्रितम भालेराव, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, पंकज धोटे, संतोष सपकाळ, माधव आरोटे, शुभांगी ढोबळे, दिपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.