क्राईम | दारूच्या नशेत राडा! खराबवाडीत 'भाई'गिरी करत फेकल्या काचेच्या बाटल्या
दहशत माजवणारे तीन आरोपी गजाआड
टेबल - खुर्ची बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात स्वतःला 'भाई' म्हणवून घेत परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि एका कामगारावर काचेच्या बाटल्या फेकून जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. हा थरारक प्रकार गुरुवारी (दि.२८ मे) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास खराबवाडी (ता. खेड) येथील 'वाईन किंग' दुकानाच्या बाहेर घडला.
याप्रकरणी रिपन निरन बरमन (वय २२, रा. शिवशंकर सोसायटी, खराबवाडी) याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अरविंद गावडे (वय २४, रा. खराबवाडी, मूळ रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक),सलमान रहिम नदाफ (वय २४, रा. खराबवाडी, मूळ रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक),गुफरान कलीम अहमद (वय २५, रा. मेदनकरवाडी, मूळ रा. सितापुर, उत्तर प्रदेश) यांच्यावर म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपन निरन बरमन आणि आरोपी एकाच ठिकाणी दारू पीत बसले होते. त्यावेळी टेबल आणि खुर्ची साईडला घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले.
"मी राहुल भाई आहे, तुम्ही बाहेर चला तुम्हाला दाखवतो," अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादीला दुकानाच्या बाहेर नेले. त्यानंतर तिथे पडलेल्या काचेच्या रिकाम्या बाटल्या जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने भिरकावल्या. यातील एक बाटली रिपन यांच्या डोक्यात थेट लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाला.
हाणामारी एवढ्यावरच थांबली नाही, तर आरोपींनी आपला मोर्चा तळेगाव-चाकण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडे वळवला. आरोपींनी रस्त्यावरील लोकांच्या दिशेनेही काचेच्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले.
यावेळी मुख्य आरोपी राहुल गावडे हा रस्त्यावर उभा राहून जोरजोरात ओरडत होता, "मी खराबवाडीतील भाई आहे, माझ्या नादाला कोणी लागायचे नाही!" आरोपींच्या या हैदोसामुळे आणि गुंडगिरीमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. आजूबाजूच्या दुकानदारांनी भीतीपोटी आपली दुकाने तातडीने बंद केली. परिसरात दहशत निर्माण केल्यानंतर तिन्ही आरोपी मोठमोठ्याने शिवीगाळ करत तेथून पसार झाले होते.घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास सुरू आहे.
------------------