जिल्हा परिषदेत विजयदादांची ‘दादागिरी’; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी निवड

 0
जिल्हा परिषदेत विजयदादांची ‘दादागिरी’; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी निवड

राजकीय | पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी खेड तालुक्यातील तडफदार नेतृत्व अ‍ॅड. विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या विशेष बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विजयदादांचे वजन पुन्हा अधोरेखित झाले आहे.

पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

यापूर्वी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून विजयदादांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत, तसेच प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन सर्व सदस्यांनी त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.

अभ्यासू नेतृत्व, आक्रमक शैली आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड ही विजयदादांची ओळख मानली जाते. जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे नेतृत्व प्रभावी ठरणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, गुलाब पारखी, दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, विनया मुंगसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन विजयदादांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.