कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग; शिवसेना उमेदवार विनया मुंगसे यांना मतदारांचा ठाम पाठिंबा
ZP ELECTION | कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोलेगाव–पिंपळगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रचारार्थ आमदार बाबाजी काळे यांचा प्रचार दौरा व जाहीर सभा उत्साहात पार पडली.यावेळी आमदार बाबाजी काळेनी शिवसेनेचा व ठाकरेंचा विचार पुढे नेत सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यास या संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केला.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा अभिमानाने फडकणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात प्रचाराला अधिक वेग आला असून, प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर निघोजे गाव, मोईगाव (फलके वस्ती), केळगाव (हनुमानवाडी), चऱ्होली तसेच धानोरे गाव येथे प्रचार यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान स्थानिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेत विकासाबाबतचा विश्वास अधिक दृढ करण्यात आला.
प्रचार दौऱ्यांमध्ये कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विनयाताई सुधीर मुंगसे, कुरुळी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार कु. गौरीताई चंदन मुऱ्हे,आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार काळुराम थोरवे, उद्योजक सुधीर मुंगसे,चंदनदादा मुऱ्हे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेकडून मिळणारे प्रेम, विश्वास आणि आपुलकी हीच खरी ताकद असून, “विश्वास तुमचा, जबाबदारी माझी” या भावनेतून कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याचा संकल्प यावेळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांनी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.