जिल्हा परिषद,पंचायत समिती इच्छुकांच्या पुन्हा आशा मावळल्या;तरीही इच्छुकांचा यात्रा सांस्कृतिक कार्यक्रमांवर जोर
सह्याद्री DIGITAL NEWS | मागील काही दिवसांपासून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असे असतानाच अचानक नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजून निवडणुका पार पडल्या. दुसऱ्या टण्यात तरी जि.प.,पं.स.च्या निवडणुका लागतील अशी आशा इच्छुकांना लागून राहिली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागत पंचायत समिती,जिल्हा परिषद इच्छुकांच्या पुन्हा एकदा अशा मावळल्या असल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खेड तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदेला काही ठिकाणी दुरंगी तर काही जागांवर तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने राजकीय वातावरण तापू लागले असले तरी पुन्हा एकदा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागलेले इच्छुक थंडावले आहेत. बहुतांशी इच्छुकांनी मागील महिनाभरापासूनच यंत्रणा सुरू केली असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांचे लक्ष वळवण्यासाठी देवदर्शन, कोकण दर्शन, सहली असे उपक्रम राबविले, तर काहींनी आपल्या गट/गणात चार चार वेळा मतदारांच्या गाठीभेटी घेऊन यावेळचे उमेदवार आम्हीच,विकास कामांसाठी आमच्या पाठीशी उभे राहुन आपल्या माणसाला साथ द्या असे मतदारांना आवाहन केले आहे, तर अनेक जन मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करू लागले आहेत.
आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचाली आणखी वाढण्याची शक्यता आहे.खेड तालुक्यातील काही ग्रामीण तर बहुतांश पट्टा औद्योगिक असून भौगोलिक दृष्ट्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे काही गट/गण भले मोठे असून निवडणूक काळात उमेदवारांना पूर्ण प्रत्येक गावांमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे. सात वर्षांनंतर होणारी यंदाची निवडणूक ही मोठी अटीतटीची होणार असून आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
* सहलीसाठी राजकीय पक्षांची स्पर्धा -
एका राजकीय पक्षाने एका गावातील महिलांना सहलीसाठी पाठवले तर दुसरा राजकीय पक्ष त्याच किंवा शेजारच्या गावातील महिलांना सहलीसाठी पाठवीत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत जवळजवळ हजारोच्या घरात महिला सहलीसाठी जाऊन आल्या आहेत. तर पुन्हा अनेक महिला जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सहलीसाठी राजकीय पक्षांची स्पर्धा चालल्याचे चित्र असतानाच खेड तालुक्यात आला सहलीचा महिना असे महिलांकडून दिलखुलासपणे बोलले जात आहे.