चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएच्या रस्त्यांचा समावेश
पुणे : चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते येत्या २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात यावेत.रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे,एमआयडीसीचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चाकण परिसरातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः तळेगाव चौक,राणूबाईमळा,खराबवाडी,वाघजाई नगर–खराबवाडी रोड,महाळुंगे इंगळे येथील सर्व चौक,खालुंब्रे येथील सर्व चौक,शिंदे वासुली येथील सर्व चौक,आंबेठाण वाय कॉर्नर,कोरेगाव फाटा तसेच बिरदवडी फाटा,दवणे मळा ते द्वारका सिटी रोड,कॉर्निंग कंपनी ते राष्ट्रीय महामार्ग पुणे -नाशिक या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला असल्याची नोंद घेण्यात आली. या सर्व ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले.
रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.