'तुम्ही थांबा ना सरकार...' लावणीचा राज्यभरात डंका; चाकणच्या दीपक मांडेकर यांच्या कलाकृतीला रसिकांची पसंती

 0
'तुम्ही थांबा ना सरकार...' लावणीचा राज्यभरात डंका; चाकणच्या दीपक मांडेकर यांच्या कलाकृतीला रसिकांची पसंती

चाकण (पुणे) - "तुम्ही थांबा ना सरकार..." ही लावणी सध्या महाराष्ट्रभर प्रचंड चर्चेत आहे. व्यावसायिक दर्जाचे चित्रीकरण, आकर्षक संगीत, प्रभावी सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांमुळे या लावणीला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती निर्माते युवा कलावंत दीपक मांडेकर यांनी दिली.

* ​दिग्गज कलाकारांची जुळली भट्टी -

​या लावणीला राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजविले असून, संगीत संयोजन ओंकार केळकर यांचे आहे. विशेष म्हणजे, या लावणीचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी त्रिवेणी धुरा दीपक मांडेकर यांनी स्वतः सांभाळली आहे. याशिवाय, निखिल पडवळ यांनी सिनेमॅटोग्राफी (छायांकन) तर अविनाश नलावडे यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी चोख पार पाडली आहे.

* ​अभिनयाला प्रेक्षकांची दाद -

​लावणीच्या सादरीकरणात अभिनेत्री प्रतिभा जोशी आणि अभिनेते विश्वास पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून, त्यांच्यातील जुगलबंदी आणि अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळत आहे.

* ​सांस्कृतिक वारसा आणि नवी ओळख -

'मॉडेल व्हिलेज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेठाण (ता. खेड) गावचे रहिवासी असलेल्या दीपक मांडेकर यांनी आपल्या कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा जपत गेली दोन दशकांहून अधिक काळ नाट्य व अभिनय क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. आता गीत-संगीत क्षेत्रात पाऊल टाकत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या यशामुळे चाकण परिसराचे नाव राज्यभरात अभिमानाने घेतले जात आहे.

* ​यूट्यूबवर धुमाकूळ -

​सध्या ही लावणी 'वडवानल प्रोडक्शन' या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाली असून, सोशल मीडियावरही तिची जोरदार चर्चा आहे. संगीतप्रेमी आणि लावणी शौकिनांनी ही दर्जेदार कलाकृती आवर्जून पाहावी, असे आवाहन निर्मात्यांच्या वतीने करण्यात आले आहे.