दिलेला शब्द, केलेली कृती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश - गणेश बोत्रे
शिंदेगाव आणि खालुंब्रे ग्रामपंचायतींना एकूण २० हेक्टर गायरान जागा हस्तांतरित
खेड (पुणे ) : दिलेला शब्द पाळणे, त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आणि विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे या त्रिसूत्रीच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.शिंदे ग्रामपंचायतीसाठी तब्बल १४ हेक्टर आणि खालुंब्रे ग्रामपंचायतीसाठी ६ हेक्टर गायरान जागा ग्रामपंचायतींकडे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) हस्तांतरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
हा निर्णय केवळ एक प्रशासकीय आदेश नसून, दोन्ही गावांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया ठरणार आहे. या जागेमुळे गावातील सार्वजनिक सुविधा, मूलभूत विकासकामे आणि भविष्यातील नियोजनाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी दिली.
* जनतेच्या सेवेसाठीच यश समर्पित -
या ऐतिहासिक निर्णयाबाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,"जनहितासाठी घेतलेला प्रत्येक पुढाकार, केलेला प्रत्येक पाठपुरावा आणि मिळवलेले प्रत्येक यश हे जनतेच्या सेवेसाठीच समर्पित आहे. या जागा हस्तांतरामुळे दोन्ही गावांच्या विकासाचा प्रलंबित प्रश्न सुटला असून, यामुळे भविष्यात अनेक लोककल्याणकारी प्रकल्प राबवणे शक्य होणार आहे."
*वरिष्ठ पातळीवरून मोलाचे सहकार्य -
या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवरून मोठे सहकार्य लाभले. यामध्ये प्रामुख्याने:
उपमुख्यमंत्री: सुनेत्रा अजित पवार
उद्योगमंत्री: उदय सामंत
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष: वीरधवलजी जगदाळे
माजी आमदार (खेड आळंदी ): दिलीप मोहिते पाटील
पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी: गजानन पाटील
तसेच एमआयडीसीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे बोत्रे यांनी आवर्जून नमूद केले.
*विकासाला मिळणार नवी गती -
MIDC कडून दोन्ही ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आलेल्या या एकूण २० हेक्टर गायरान जागेचा वापर गावातील अंतर्गत रस्ते, पाणी योजना, क्रीडांगण, समाजमंदिर आणि इतर शासकीय इमारतींच्या उभारणीसाठी केला जाणार आहे. गणेश बोत्रे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे शिंदे आणि खालुंब्रे ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.