ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा चाकण पोलिसांकडून पर्दाफाश; ४८ गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

उत्तर चाकण पोलिसांची दमदार कारवाई

 0
ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा चाकण पोलिसांकडून पर्दाफाश; ४८ गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

चाकण : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या मालिकेचा अखेर चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन सराईत आरोपींना अटक केली असून, या टोळीवर राज्यभरात तब्बल ४८ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई चाकण परिसरातील दोन मोठ्या ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांनंतर करण्यात आली. १५ ते १६ मे २०२६ दरम्यान बिरदवडी येथील नेक्सस व्हेन्चर्सच्या लेझर कटिंग वर्कशॉपमधून ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता. त्याआधी मार्च महिन्यात कृष्णाई खडी क्रश प्लांटमधूनही ट्रान्सफॉर्मर लंपास करण्यात आला होता. दोन्ही घटनांमुळे उद्योग क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांनी परिसरातील तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. वाहनांची हालचाल, संशयितांच्या हालचाली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची साखळी जोडण्यात आली. या तपासातून आरोपी अहिल्यानगर परिसरात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २६), श्रीकांत शिवाजी जाधव (वय २४) आणि विशाल खंडू पवार (वय २८) यांचा समावेश आहे. चौकशीत या टोळीने खेड, शिरूर, शिक्रापूर आणि यवत परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याची कबुली दिल्याचे समजते. आरोपींकडून दोन गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, ट्रान्सफॉर्मरमधील तांबे आणि इतर मौल्यवान साहित्य विकून टोळी लाखो रुपयांची कमाई करत होती. औद्योगिक भाग आणि निर्जन परिसरातील ट्रान्सफॉर्मर हेच या टोळीचे प्रमुख लक्ष्य होते. चोरीमुळे अनेक उद्योगांचे कामकाजही विस्कळीत झाले होते.

पोलीस उप आयुक्त मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, आतिष नरवडे तसेच तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कामगिरी बजावली.