मराठी चित्रपटसृष्टीच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत चाकणच्या भगवान मेदनकर यांची उडी

 0
मराठी चित्रपटसृष्टीच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे

पुणे : मराठी चित्रपटसृष्टी,नवनिर्माते आणि तळागाळातील कलाकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चाकणच्या तरुणाने आता थेट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.नाट्य व चित्रपट निर्माते भगवान मेदनकर यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६ ते २०३२ साठी “निर्माता” विभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मराठी नाटक, चित्रपट आणि सामाजिक आशय असलेल्या कलाकृतींमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे भगवान मेदनकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कलाक्षेत्रात सक्रिय आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित कलाकार, निर्माते आणि ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या समस्या शासन आणि महामंडळापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आपण सातत्याने काम करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

भगवान मेदनकर यांनी “माहेर माझ”, “हम गया नही जिंदा हू” आणि “कॉलेजियन्स” या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच “पळा पळा कोण पुढे पळे” या नाटकाची निर्मिती करताना त्यांनी मनोरंजनासोबत सामाजिक आशयही जपला. विशेष म्हणजे “शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या गाजलेल्या आणि अजरामर ठरलेल्या नाटकाच्या निर्मितीतही त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या नाटकाने महाराष्ट्रभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे.

निर्माते म्हणून काम करत असतानाच अभिनय क्षेत्रातही भगवान मेदनकर यांनी स्वतःची छाप उमटवली आहे. “गोंधळ” आणि “घर बंदूक बिर्याणी” या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “घर बंदूक बिर्याणी” चित्रपटात त्यांनी साकारलेली आमदाराची भूमिका विशेष गाजली होती. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले होते.

महामंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या निर्मात्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील कलाकारांना संधी, नाट्यसंस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे भगवान मेदनकर यांनी सांगितले.

चाकणसह संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत असून कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.