खेड तालुक्यात विकासकामांची पाहणी; प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना

 0
खेड तालुक्यात विकासकामांची पाहणी; प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना

खेड : पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी खेड तालुक्यातील विविध गावांना भेट देत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

चासकमान गावात मीना शंकर भवार यांच्या शेतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे,सुनिता बुट्टे,दिप्ती भोगाडे,तनुजा घनवट, पंचायत समिती उपसभापती मंगेश सावंत,सदस्य मह्रेंद्र मेदनकर,शंकर कावडे,निखिल थोरवे,दिनेश हांडे,गटविकास अधिकारी विशाल शिंदे,शाखा अभियंता कचरे,कृषी अधिकारी खेडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वाडा गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

बुरशीवाडी येथील कृषी वैद्यकीय दवाखान्यालाही भेट देण्यात आली. शेतकरी व नागरिकांसाठी सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, खेड पंचायत समिती येथे सर्व विभागीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत ती तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच खेड तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन अमोल नलावडे यांनी दिले.