रात्रपाळीच्या कामावर जाणाऱ्या कामगार महिलेवर बलात्कार ; नराधमास चोवीस तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाकण ( पुणे ) : रात्रपाळीला कामावर जाणाऱ्या कामगार महिलेचे तोंड दाबून,तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत अज्ञात इसमाने पाशवी बलात्कार करण्यात आल्याची घटना (दि.१३) रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत चाकण जवळील मुटकेवाडी (ता.खेड) येथे घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला ही चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत रात्रपाळीवर कामासाठी जात होती.त्यावेळी तिच्या पाठीमागून आलेल्या एका अज्ञात इसमाने तिला जबरदस्तीने अंधारातील आड बाजूस ओढून नेले.आणि तेथे तिच्यावर जबरदस्तीने पाशवी बलात्कार करून,मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली.
सदर घटनेची चाकण पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी चाकण,महाळुंगे एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथकांसह तब्बल शंभर पोलिसांचा ताफा परिसरात तपास करत होता.घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून तांत्रिक विश्लेषकाचे सहकार्य घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती देत नराधम आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे (वय.२१ वर्षे,सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीला घटनेनंतर अवघ्या २४ तासाच्या आत अटक केल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.