CRIME | सायबर फसवणूक प्रकरणात तिघांना अटक;परदेशातील कॉल सेंटरचा धागा उघड

 0
CRIME | सायबर फसवणूक प्रकरणात तिघांना अटक;परदेशातील कॉल सेंटरचा धागा उघड

पिंपरी-चिंचवड : शेअर व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटींहून अधिक रक्कम उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे.या प्रकरणात पश्चिम बंगाल व पंजाब येथील दोन इसमांसह नवी मुंबईतील एका खातेदाराला अटक करण्यात आली आहे.

सायबर पोलीस ठाण्यात गु.र. नं. ०८/२०२६ अन्वये दाखल गुन्ह्यात फिर्यादीकडून २,०९,३०,५३७ रुपये उकळण्यात आले होते. आरोपींनी विविध कारणे सांगत गुंतवणुकीच्या नावाखाली वारंवार पैसे घेतले;मात्र कोणताही परतावा दिला नाही.

तपासादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात १.२५ लाख रुपये जमा झाल्याचा तपशील समोर आला. हे खाते ‘आरशिल इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या नवी मुंबईतील कंपनीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून नवी मुंबई येथे छापा टाकत सुशिल भगवान जुवाटकर (वय ४२) याला ताब्यात घेतले.

चौकशीत जुवाटकर याने हे खाते साथीदार पंकज राज कपुर (वय ३८, मूळ जालंधर, पंजाब) आणि निश्चल टंकबीर बरेयली (वय २७, मूळ दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) यांच्यासह वापरल्याची कबुली दिली. पुढील तपासात हे दोघे बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याचे उघड झाले.हे तिघे नवी मुंबईत नवीन कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली. 

आरोपींकडून ६ मोबाईल, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्डडिस्क, २ क्यूआर स्कॅनर, १२ शिक्के, २४ बँक खात्यांची किट आणि ५ डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फिर्यादींचे ६२ लाख रुपये होल्ड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे,वनिता धुमाळ, प्रविण स्वामी,वैभव पाटील,सागर पोमण, रोहीत डोळस,प्रकाश कातकाडे,विदया पाटील,दिपक भोसले,विनायक म्हसकर,हेमंत खरात,सुभाष पाटील,अतुल लोखंडे,मुकुंद वारे,किरण देवकर,श्रिकांत कबुले,विशाल निचित,सोपान बोधवड,नितेश बिचेवार,दिपाली चव्हाण,भाविका प्रधान यांच्या पथकाने केली आहे.