चाकणमध्ये गांजा विक्रीप्रकरणी तरुणास अटक; ९३२ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
सह्याद्री DIGITAL NEWS | चाकण शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका १९ वर्षीय तरुणास गांजाची विक्री करताना अटक करण्यात आली.त्याच्याकडून ९३२ ग्रॅम वजनाचा व ४५ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून
वैभव संजय शिंदे (वय १९,रा. सदगुरु कॉम्प्लेक्स, जय हिंद हॉस्पिटलसमोर,चाकण) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण गावच्या हद्दीत (दि.१९ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रेश्वर मंदिराच्या कमानीजवळील पानटपरीच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली.पोलीस हवालदार बी.एम.यादव यांच्या पथकास गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी झडती घेतली असता आरोपी गांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने हा अंमली पदार्थ बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या साखळीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.