खेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; चिखलगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

 0
खेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; चिखलगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात
खेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; चिखलगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

सामाजिक | खेड तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसासह वाऱ्याच्या जोरदार झोतांमुळे काढणीस आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून चिखलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

चिखलगाव परिसरात गहू, कांदा, मका तसेच इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने कापणी केलेला गहू पूर्णपणे भिजला असून त्याची गुणवत्ता घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कांदा पिकालाही मोठा फटका बसला असून सडण्याचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी उभ्या पिकांचे वाऱ्यामुळे आडवे होऊन नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक काढणीच्या उंबरठ्यावर असताना अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी तातडीने जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावर समीर सुपे यांनी प्रशासनाला त्वरित हालचाल करण्याच्या सूचना देत लवकरच पाहणी दौरा आयोजित करण्यात येईल, असे सांगितले.

“महसूल विभागाच्या माध्यमातून बाधित क्षेत्राचा वस्तुनिष्ठ पंचनामा तातडीने करण्यात येईल. शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन समीर सुपे यांनी दिले.

ग्रामस्थांनी प्रशासनाने विलंब न लावता प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन नुकसानीचा आढावा घ्यावा आणि पंचनाम्यांची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.