तुम्ही तर ओसाड गावाचे राजे;माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा विरोधकांवर घणाघात

राजगुरूनगर ( पुणे ) : खेड तालुका खरेदी-विक्री संघाची सत्ता मिळवली म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तसे समजणाऱ्यांची अवस्था ओसाड गावाच्या राजासारखी आहे,अशी घणाघाती टीका माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांवर केली.
राजगुरूनगर शहरातील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जुना वाडा रोड ते पुढे नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण व आरसीसी पाइपड्रेनेज लाइनसाठी माजी आमदार मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून ८४ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे भूमिपूजन मोहिते पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) सायंकाळी उशिरा झाले,त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,बाजार समिती माजी उपसभापती विठ्ठल वनघरे,व्यापारी सेल जिल्हा अध्यक्ष नितीन गुरव,वैभव घुमटकर,वैभव नाईकरे,नितीन ताठे, अमित घुमटकर,सागर सातकर,संतोष भागे,अँड. महादेव घुले,मनोज आहेर,शुभम सोनवणे, सुजाता पचपिंड,मिनाक्षी भांग,हिरामण पडवळ, फैज मोमीन,इम्रान मोमीन,रफिक मोमीन,कैलास दुधाळे आदी उपस्थित होते.
पुढे मोहिते पाटील म्हणाले,राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शिंदे सेना यांची सत्ता आहे. भाजपचा मुख्यमंत्री आहे,मात्र त्यांच्यावर कोणी टीका करीत नाहीत.तिथे त्यांची हिम्मत होत नाही,टीका मात्र दिलीप मोहित्यांवर करायची. खरेदी-विक्री संघात काहीच सुविधा नाहीत.
नितीन ताठे यांनी शहरातील विविध प्रश्नावर मनोगत व्यक्त केले.अॅड. महादेव घुले यांनी मार्गदर्शन केले,
* खरेदी-विक्री संघाच्या कारभाराबाबत न्यायालयात जाणार -
खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या कारभाराबाबत आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहोत.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतःची छाती बडवून घेतली.आम्ही सत्ता आणली असे सांगणाऱ्यांचा हा विचार केला का? त्यात भाजप,शिवसेना,काँग्रेसला घेतले आहे आणि मग तुम्ही (शरद पवार गट) माणून म्हणून सत्ता आली. जनतेने तुम्हाला संधी दिली मग आता करून दाखवा. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो, संघ ताब्यात आला. काय करणार ते सांगा. यामागे तर काही झाले नाही. आता कर्तृत्व दाखवा, असे माजी आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.