औद्योगिक क्षेत्रात किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला;लाकडी दांडके - विटांनी जबर मारहाण
क्राईम | चाकण औद्योगिक वसाहतमधील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील येलवाडी (तालुका खेड) गावाजवळ हॉटेल इंद्रायणी समोरील मोकळ्या जागेत किरकोळ वादातून तिघांवर दांडके,विटा व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.
याप्रकरणी तोहीत इनामदार,सार्थक पाडळे, आशिष माने व सिद्धार्थ लांघे (सर्व रा. देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आकाश ढेरंगे व प्रशांत जाधव यांच्यात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी, आकाश ढेरंगे व प्रसाद म्हस्के यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी लाकडी दांडके, विटा तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीला व उजव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर झाले. तसेच आकाश ढेरंगे यांच्या पाठीवर मार लागून डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाके पडले आहेत. प्रसाद म्हस्के यांच्या डाव्या पायालाही फ्रॅक्चर झाले आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी हातातील दांडके हवेत फिरवत “आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.