CRIME | प्रेमासाठी आईने केली पोटच्या ६ वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या

 0
CRIME | प्रेमासाठी आईने केली पोटच्या ६ वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या

चाकण : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आईनेच आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना खेड तालुक्यातील कुरुळी येथे उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आवेज मेहबुब शेख (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई बसरीन मेहबुब शेख (वय २७) हिला पोलिसांनी अटक केली असून तिचा फरार प्रियकर राम विनायक कजेवाड याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवेज हा आपल्या आईसोबत कुरुळी (ता. खेड) येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. आई आणि तिच्या प्रियकराच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगनमत करून या निष्पाप मुलाला संपवण्याचा थरकाप उडवणारा कट रचला.

शनिवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपींनी आवेजला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर पाण्याच्या बादलीत त्याचे डोके बुडवून दाबून ठेवले. एवढ्यावरच न थांबता भिंतीवर डोके आपटून त्याची निर्घृण हत्या केली.

गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह इर्टिगा कारमधून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेला. तेथे मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र संशय आल्याने मुलाचे आजोबा इसाक महमद शेख (वय ४९) यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी बसरीन शेख हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर हा गुन्हा दक्षिण महाळुंगे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आईला अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी राम कजेवाड याचा शोध सुरू आहे.

आईनेच आपल्या पोटच्या लेकराचा बळी घेतल्याच्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.